


पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे ) : प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला राज्यभर अनुकूल वातावरण असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. नगरपालिकांच्या निवडणुकांत महायुतीचे मोठ्या संख्येने नगराध्यक्ष निवडून आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभर फिरताना महायुतीसाठी सकारात्मक वातावरण दिसून येत असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष्ट्रवादीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे ते म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असल्या तरी तो रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट करत तटकरे म्हणाले, “अर्ज भरण्यापूर्वी जे वातावरण होते, ते आता राहिलेले नाही. शहराचे वातावरण राष्ट्रवादीसाठी अनुकूल झाले आहे.”
“पुणे मेट्रोची सुरुवात २०१० पासून झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याला गती दिली.” मेट्रो आणि पीएमपी मोफत बस प्रवासाच्या घोषणांवर प्रश्न उपस्थित झाले असले तरी, “प्रदेशाध्यक्ष म्हणून शब्द देतो, आमची सत्ता आल्यावर पहिल्याच बैठकीत मेट्रो आणि पीएमपी मोफत बस प्रवासाचा निर्णय घेतला जाईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. खर्चाचा मुद्दा उपस्थित होत असला तरी बचत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबत बोलताना तटकरे म्हणाले, “निवडणुकीपुरती आमची युती आहे. विलिनीकरणाचा विषय मोठा असून त्याचा निर्णय शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. मात्र २०२९ मध्ये आम्ही सत्तेत एकत्र असू, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.”
महायुतीतील अंतर्गत मतभेदांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, टोकाची टीका होऊ नये, असा निर्णय महायुतीच्या बैठकीत झाला होता. मुख्यमंत्री, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चेनंतर गेल्या आठवडाभरात वातावरणात बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तशी विधाने पुन्हा झाली नाहीत, असेही तटकरे म्हणाले.
“आता एकहाती सत्ता येण्याचे दिवस गेले आहेत,” असे सांगत त्यांनी निकालानंतर एकत्र येण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करत पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली आहे, हे मान्य करावे लागेल, असेही तटकरे यांनी नमूद केले. गुन्हेगार उमेदवारांबाबत अजित पवार यांनी आधीच खुलासा केल्याचेही त्यांनी सांगितले.
