


४ ते १५ वर्षांच्या चिमुकल्यांनी साकारला इतिहास; हाऊसफुल प्रयोगाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद.
विषय हार्ड न्युज, नवी दिल्ली:राधिका क्रीएशन्स प्रस्तुत आणि डी ए व्ही पब्लिक स्कूल, औंध (पुणे) यांच्या सहयोगाने साकारलेले “राजे शिवबा” हे बालनाटक अलीकडेच दिमाखात रंगमंचावर सादर झाले. हाऊसफुल प्रयोग, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनांनी ओथंबलेला प्रतिसाद यामुळे हा प्रयोग केवळ नाट्यप्रयोग न ठरता एक भव्य सांस्कृतिक सोहळा ठरला.
या नाटकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रयोगातील कलाकार हे अवघ्या ४ ते १५ वर्षे वयोगटातील बालकलाकार आहेत. एवढ्या लहान वयात त्यांनी दाखवलेली अभिनयातील परिपक्वता, नेमकी संवादफेक, प्रभावी देहबोली आणि भावनिक अभिव्यक्ती यामुळे प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या संकल्पनेची पेरणी अत्यंत प्रभावी पद्धतीने रंगमंचावर उलगडली. शिवबा – तनुष पुराणिक, शिवाजी महाराज – आरव गायकऱ, जिजामाता – अवनी खरात, तानाजी – सक्षम इजागज, शिवम – कार्तिक दीक्षित, बहिर्जी नाईक – वेदांत ठाकरे, अफझल खान – सर्वज्ञ लांबट, औरंगजेब – इंद्राक्षी विश्वकर्मा आणि शाइस्तेखान – प्रिस्का डी’मोंटी यांनी आपल्या दमदार भूमिकांमधून प्रेक्षकांची मनापासून दाद मिळवली.
या नाटकाच्या लेखिका, दिग्दर्शिका आणि निर्मिती प्रमुख सौ. राधिका देशपांडे असून निर्मिती प्रमुख म्हणून सौ. राधिका दारवेकर यांनी या भव्य प्रयोगाला दिशा दिली. महेश साळगावकर यांचे भव्य नेपथ्य, प्रशांत फासगे यांचे परिणामकारक संगीत, डॉ. प्रसन्ना शेंबेकर व महेंद्र वाघ यांची आशयघन गीते आणि हर्षवर्धन पाठक यांची प्रकाशयोजना यांनी नाटकाची उंची अधिक वाढवली. विशेष म्हणजे, अवघ्या १० वर्षांच्या विहान दारवेकर याने स्वतः तलवारबाजी शिकून सहकारी बालकलाकारांना प्रशिक्षण दिले, ही बाब प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
“राजे शिवबा” हे नाटक केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता संस्कार, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागवणारा प्रेरणादायी अनुभव ठरला आहे.
मानाचा तुरा :
दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित National School of Drama या व्यासपीठावर जगभरातील मोजक्या उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली जाते. त्यामध्ये याच बालकलाकारांनी साकारलेल्या “सियावर वर रामचंद्र की जय” या नाट्यप्रयोगाची निवड होणे ही केवळ संस्थेसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. एवढ्या लहान वयात या कलाकारांनी भारतीय संस्कृती आणि नाट्यपरंपरेचा ठसा जागतिक स्तरावर उमटवला — हा खऱ्या अर्थाने सन्मानाचा क्षण आहे.
या यशाकडे केवळ बातमी म्हणून न पाहता, या कर्तृत्ववान बालकलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप पोहोचवणे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शक्य तितका हातभार लावणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.


