


नियमबाह्य पदोन्नतीचा आरोप; त्रि-सदस्यीय समिती गठीत.
विषय हार्ड न्युज:पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) मध्ये आवश्यक शैक्षणिक व सेवा पात्रता नसतानाही ठराविक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने पदोन्नती देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रिक्त जूनियर क्लर्क पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध असताना सुमारे २०० कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आल्याने सेवा अटी, प्रशासकीय नियम आणि प्रक्रियेचे उल्लंघन झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी तसेच संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत PMPML चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. पृथ्वीराज बी. पी. यांनी चौकशीसाठी त्रि-सदस्यीय समिती गठीत करण्याचा अधिकृत आदेश जारी केला आहे.दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीतच ही पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात आल्याचेही समोर आले आहे. शैक्षणिक पात्रता, सेवाज्येष्ठता, अनुभव, वयोमर्यादा आणि अन्य अनिवार्य अटी पूर्ण होत नसतानाही कर्मचाऱ्यांना कनिष्ठ पदावरून वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप असून, संबंधित सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.यासंदर्भात शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, “PMPML मध्ये नियम डावलून ठराविक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. शिवसेनेने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच या प्रक्रियेची चौकशी सुरू झाली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.”शिवसेनेने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे PMPML मधील या संशयास्पद पदोन्नती प्रक्रियेची अधिकृत चौकशी सुरू झाली असून, या चौकशीतून प्रशासनातील संभाव्य अनियमितता, अधिकारांचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराबाबतचे सत्य समोर येण्याची शक्यता आहे. प्रशासनातील बेजबाबदारपणा व भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेना यापुढेही आक्रमक भूमिका घेत राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

