


पुणे(प्रतिनिधी पायल पोटभरे) : पुणे महापालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून प्रचाराचा जोर वाढला आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका करताना, “पुण्याचा डान्सबार होऊ देऊ नका, पुण्याची गुन्हेगारी वाढू देऊ नका,” असे आवाहन पुणेकरांना केले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत धंगेकर यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना थेट प्रश्न विचारले. ते म्हणाले, “एका बाजूला गुंडांसोबत व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे उमेदवारी नाकारल्याचे सांगितले जाते आणि दुसरीकडे भाजपचे नेते गुंडांसोबत दिसतात. निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांचा डान्सबारमधील व्हिडीओही समोर आला आहे. माझ्याकडे अनेक व्हिडीओ आहेत; मात्र मला व्यक्तिगत टीका करायची नाही. पुणेकरांना लुटण्याचा प्रयत्न सुरू आहे. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी यावर खुलासा करावा,” अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारी प्रवृत्ती संपवण्याऐवजी तिला खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीचा उल्लेख करत धंगेकर म्हणाले, “मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेले शब्द पाळले. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना थेट आर्थिक मदत मिळाली. पुण्यातील जुन्या वाड्यांमधील पाणीमीटरमुळे वाढलेल्या बिलांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असून मीटर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
तसेच, “नगरविकास खाते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याने पुढील दहा वर्षांत पुण्यातील झोपडपट्ट्या हटवून नागरिकांना हक्काची घरे देण्यात येतील. पुणे शहरासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल,” असेही धंगेकर यांनी स्पष्ट केले. या सर्व बाबींचा विचार करून पुणेकरांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
