


विषय हार्ड न्युज,खानापूर, प्रतिनिधी ( विशाल भालेराव): आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून शरद लाला जावळकर यांनी आज अधिकृतपणे एबी फॉर्म भरला. यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले असून परिसरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
एबी फॉर्म भरल्यानंतर कार्यकर्त्यांनी “आता माघार नाही, हा कार्यकर्त्यांचा आवाज आहे” अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शरद लाला जावळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,
“हा लढा माझा वैयक्तिक नाही, तर कार्यकर्ते, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य जनतेचा आहे. पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही डळमळू देणार नाही. आता माघार नाही, जनतेच्या प्रश्नांसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार.”
तसेच विकास, प्रामाणिक प्रशासन आणि लोकांशी थेट संवाद हेच आपल्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या घडामोडीमुळे आगामी निवडणुकीच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.
