


पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ–नाना पेठ) येथील उमेदवारीवरून राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू आंदेकर यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात आल्याने विरोधकांकडून टीका होत असली, तरी प्रभागातील कामांच्या आधारेच ही उमेदवारी देण्यात आल्याचा दावा आंदेकर कुटुंबीयांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सध्या दोन्ही उमेदवार कारागृहात असल्याने त्यांच्या वतीने रिया वनराज आंदेकर, प्रज्ञा शिवम आंदेकर आणि प्रियांका कृष्णराज आंदेकर या घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रभाग २३ मधील उमेदवार अनिकेत कोठावले, खान शहाबाज महमंद शरीफ यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
प्रज्ञा आंदेकर म्हणाल्या, “आम्ही जिथे जातो तिथे नागरिक आमच्या कुटुंबाने केलेल्या कामांची आठवण करून देतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याला पात्र ठरण्याचा प्रयत्न करू. प्रभागातील प्रश्न सोडवणे आणि सुरू असलेली विकासकामे पुढे नेणे हेच आमचे ध्येय आहे.”
रिया आंदेकर म्हणाल्या, “लहानपणी वडिलांचा प्रचार पाहिला होता. आज आई नसताना तिचा प्रचार करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. वडिलांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करायची आहेत. जे काही घडले, त्याची कल्पनाही नव्हती. आता कुठेतरी हे सगळं थांबलं पाहिजे,” असे सांगताना त्या भावुक झाल्या.
प्रियांका आंदेकर म्हणाल्या, “प्रचारादरम्यान मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमच्या कुटुंबीयांनी केलेल्या कामाचीच पोचपावती म्हणून आजितदादांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. विरोधक काहीही बोलोत, प्रभागात आंदेकरांचे काम बोलते, हे वास्तव आहे.”
