


पुणे( प्रतिनिधी पायल पोटभरे) : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आघाडीच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. निवडणूक आयोगाचा दरारा संपला असून निवडणुका गैरप्रकारांच्या माध्यमातून घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पुण्यात प्रभाग रचना मुद्दाम विस्कळीत करण्यात आली असून पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
भाजप हा कमकुवत आणि भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप करत बिनविरोध निवडणुका का लादल्या जात आहेत, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. सत्ताधारी पक्ष एकमेकांवर आरोप करत असतानाही सत्तेत एकत्र कसे आहेत, असा सवाल करत अजित पवारांनी आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महायुतीवर गुंडशाहीला खतपाणी घालण्याचा आरोप करत लाडकी बहीण योजना, मोफत मेट्रोची घोषणा, वृक्षतोड आणि तापोवन प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. पुण्यात ‘पैसे उडवा आणि तमाशा बघा’ अशी परिस्थिती निर्माण झाली असून या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बाजूला सारण्याचे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
