


पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : भाजपचा जाहीरनामा प्रकाशित होत असून त्याला ‘संकल्पपत्र’ असे नाव देण्यात आल्याची माहिती खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. मागील पाच वर्षांत पुणेकरांनी भाजपला काम करण्याची संधी दिली असून, पुणेकर पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोहोळ म्हणाले, अनेक वर्षे केवळ कागदावर असलेली मेट्रो योजना अखेर सुरू करण्यात आली. प्रत्येक वेळी पुणेकरांसमोर मांडलेला जाहीरनामा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असून, त्यामुळेच पुणेकरांनी भाजपला निवडून दिले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत फक्त बालेवाडी बॅनरचा समावेश करण्यात आला असून, पुण्यातील कोणताही विकासप्रकल्प केंद्र सरकारच्या निधीशिवाय रखडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
मेट्रो प्रकल्पाचा उल्लेख करताना मोहोळ म्हणाले, “शेवटी मेट्रो झाली ना,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. “केवळ पाच वर्षे आम्ही सत्तेत आहोत. त्याआधी २५ वर्षे तुम्ही सत्तेत होता. आज जे प्रश्न उपस्थित करता, त्या काळात काय केले?” असा सवाल त्यांनी केला.
पुण्याचा विकास २५ वर्षांत रखडल्यानेच पुणेकरांनी कारभारी बदलला, असे सांगत मोहोळ यांनी भाजपच्या कामगिरीवर भर दिला. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही “माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही,” असे ठामपणे सांगत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
