


I
पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे ) : माजी खासदार सुरेश कालमाडी यांच्या निधनाने पुणे शहराने विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व गमावलं आहे, अशी भावना राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कालमाडी यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“ताकद अनेकांना मिळते, मात्र त्या ताकदीचा उपयोग करण्यासाठी व्हिजन आणि दृष्टी लागते. सुरेश कालमाडी यांच्याकडे राजकीय ताकदही होती आणि शहर विकासाची स्पष्ट दृष्टीही होती,” असे पाटील म्हणाले. त्या दृष्टीच्या जोरावर त्यांनी पुणे शहराच्या विकासासाठी ताकदीचा योग्य वापर केला, असे त्यांनी नमूद केले.
बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम उभारून देशभरातील लाखो खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणं, तसेच पुणे फेस्टिव्हलसारखा सांस्कृतिक उपक्रम सुरू करणं, हे कालमाडी यांच्या कार्याचे ठळक दाखले असल्याचं पाटील यांनी सांगितलं. पुण्याच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोठा वाटा असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं.
आजारी असतानाही शेवटच्या क्षणापर्यंत कालमाडी लोकांना भेटत राहिले, मार्गदर्शन आणि सल्ला देत राहिले, याची आठवण करून देत चंद्रकांत पाटील म्हणाले, “माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सुरेश कालमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”
