


पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : धर्मादाय संस्थेच्या जागेचा नियमबाह्य वापर करून संशयास्पद व्यवहार करण्यात आल्याचा गंभीर आरोप माहिती अधिकार अभ्यासक विजय कुंभार यांनी केला आहे. दौंड शुगर, जैन इन्फोटेक आणि कल्पवृक्ष या परस्पर संबंधित कंपन्यांच्या माध्यमातून नियमांचा भंग झाल्याचा दावा त्यांनी केला.कुं
भार यांनी सांगितले की, कोणत्याही धर्मादाय संस्थेची जागा वापरण्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक असते. मात्र संबंधित प्रकरणात परवानगी लिझसाठी देण्यात आली असताना, त्या जागेवर व्यावसायिक व्यवहार करण्यात आले. ही जागा डेक्कन शुगर या धर्मादाय संस्थेची असून इमारत कल्पवृक्ष कंपनीची आहे. या कंपनीचे काही संचालक सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहितीही त्यांनी दिली.या
जागेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचे कार्यालय असून, तेथील व्यवहार संशयास्पद असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. भाड्याने दिलेल्या जागेवर कर्ज (लोन) काढता येत नसताना, या प्रकरणात तब्बल २५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, त्या ठिकाणी कॉर्पोरेट ऑफिस उघडणे आणि जागेची विक्री करणे हे नियमबाह्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण प्रकरणावर महारेरा (महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण)ने स्थगिती दिली असल्याची माहितीही कुंभार यांनी दिली. मुंढवा प्रकरणानंतर अजित पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री, यांच्याशी संबंधित अनेक विषय समोर आले असून, या प्रकरणात जर कागदपत्रे उपलब्ध असतील तर सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा कोणत्याही अधिकृत कागदोपत्री उल्लेख नसल्याचा दावाही कुंभार यांनी केला. या प्रकरणावर भाजपकडून कारवाई करण्याची इच्छा दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
