


पुणे(प्रतिनिधी पायल पोटभरे) : शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा आणि प्रयत्न केले; मात्र समोरच्यांचा अहंकार आडवा आला, असा आरोप करत विजय शिवतारे यांनी विरोधकांना १६ तारखेला उत्तर मिळेल, असा इशारा दिला. आम्हाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे प्रत्युत्तर निकालातूनच दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवतारे म्हणाले, अवघ्या पाच तासांत १२० उमेदवार उभे केले. धंगेकर यांनी १६५ उमेदवार देण्याची घोषणा केली होती; मात्र प्रत्यक्षात १२० उमेदवारच देण्यात आले. एकाच जागेचा अनुभव असणाऱ्यांनी एवढी मोठी वक्तव्ये करणे हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली. शहरात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी भान ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

आम्ही पक्षावर टीका करणार नाही, हे निश्चित असून येणारा काळच सर्व प्रश्नांची उत्तरे देईल, असे शिवतारे यांनी सांगितले. फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे आम्ही लोक आहोत. पुणेकर आम्हाला संधी देतील, याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवतारे म्हणाले, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले गेले. त्या वेळी मला जबाबदारी दिली असती, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
पुरंदरचा संदर्भ देत ते म्हणाले, चार हजार मते मिळवण्यासाठी तेथे सरपंच किंवा मोठी यंत्रणा नव्हती. साधा चेहरा जेव्हा लोकांमध्ये जातो, तेव्हा लोक त्याला डोक्यावर घेतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा, घाबरू नये. आज तुम्ही सामान्य आहात; उद्या असामान्य व्हाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवतारे म्हणाले, संजय राऊत यांना रात्री भ्रम होतो. गुन्हेगारी संपवायची असेल, तर शिवसेना हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात शिवसेनेचा महापौरही होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
