


पुणे (प्रतिनिधी पायल पोटभरे) : इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना पुण्यात तब्बल १२० जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, शहरात शिवसेनेचं वातावरण तयार झालं आहे, असा विश्वास शिवसेना नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. पुण्यातील झालेल्या प्रचार शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.

सामंत म्हणाले, “उमेदवारांचा आत्मविश्वास पाहता १६ तारखेला निकाल लागल्यानंतर महापौर कोण बनवायचा, याचा विचार करावाच लागेल. पुणे हे बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर होतं. विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाणं महत्त्वाचं आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विकासकामे घराघरांत पोहोचवा, असे आवाहन करत सामंत यांनी “शिवशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पुण्यात होत आहे. आमचा संघर्ष नवा नाही, तो आमच्या पाचवीला पुजलेला आहे,” असे ठणकावून सांगितले.
“कुणावर टीका करण्याची गरज नाही. विरोधक आपलं काम स्वतःच करत आहेत. आपण विकासातून उत्तर द्यायचं,” असे स्पष्ट करत उमेदवारांना प्रचारात पूर्ण ताकद लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढील १४ दिवस २४x७ काम करा, घराघरांत तीन-चार वेळा जा, असा सल्लाही त्यांनी दिला.
भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना सामंत म्हणाले, “भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. ती टिकली पाहिजे, असंच आमचं मत होतं.” तसेच, वेळ कमी पडला नसता तर १६५ उमेदवार देण्याची ताकद शिवसेनेत होती, असेही त्यांनी नमूद केले.
वाहतूक कोंडी, नवले ब्रिजसारख्या प्रश्नांवर केलेली कामे पुणेकरांपर्यंत पोहोचवा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.
“आजची गर्दी हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर १६ तारखेला दाखवू,” असा विश्वास व्यक्त करत, पुण्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल, असा दावा उदय सामंत यांनी केला.
