


पुणे(प्रतिनिधी पायल पोटभरे) : भाजप नेत्या पूजा मोरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भावनिक होत आपली भूमिका स्पष्ट केली. १२ वर्षांचा संघर्ष डोळ्यासमोर उभा राहताच त्यांना अश्रू अनावर झाले. “माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. शेतकऱ्यांसाठी आयुष्य झोकून दिलं. आंदोलनं केली, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्ल्या, गुन्हे दाखल झाले, तर कधी दोन-दोन दिवस पोलिस ठाण्यात झोपावं लागलं,” असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आंदोलनांदरम्यान आलेल्या अडचणी, वकिलांची फी भरण्यासाठीही पैसे नसल्याचे अनुभव त्यांनी मांडले. संभाजी राजे यांच्यासोबत काम करताना तसेच प्रभागात जनतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख त्यांनी केला. काश्मीरमध्ये घडलेल्या घटनेनंतर आपण आंदोलन केल्याचा व्हिडिओ एका तासात समोर आणल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर चुकीचे संदेश आणि व्हिडिओ पसरवले गेले, असा आरोप त्यांनी केला.
उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधकांकडून षड्यंत्र रचले गेल्याचा आरोप करत, “माझ्यावर अन्यायकारकपणे दोष ठेवण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जे वाक्य माझ्या नावाने फिरवलं जात आहे, ते माझं नाही,” असेही त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यासोबतचा व्हायरल फोटो शेतकऱ्यांसाठी कापूस देण्याच्या कामावेळी काढलेला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“मी भाजपची कार्यकर्ता आहे आणि राहणार आहे. हिंदुत्वासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे,” असे सांगत त्यांनी झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र आज आपण मोठा त्याग करत असल्याचे सांगत, “मी निवडणूक लढवणार नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीतील एकूण चारही अर्ज आज मागे घेतले आहेत. पक्षाकडून कोणताही दबाव नव्हता,” अशी घोषणा पूजा मोरे यांनी केली.
