


विषय हार्ड न्युज,पुणे : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत चर्चा सुरू असून, जागावाटपाचा प्रस्ताव तयार करून प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. जागावाटपाबाबत सर्व अधिकार काकडे, तांबे आणि चव्हाण यांना देण्यात आले असून, स्थानिक नेत्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा देत सुळे म्हणाल्या, “रोज नवी सकाळ होते.” अजित पवार यांच्याशी अंतिम आकडे हातात आल्यानंतरच चर्चा होईल, असे सांगत त्यांनी सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे नमूद केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याची परंपरा नसली, तरी गेल्या १८ वर्षांत आम्ही एकत्र आलो आहोत. माविआ एकत्र लढावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे सुळे म्हणाल्या. मुंबईतील जागावाटपाबाबत आज पुन्हा बैठक होणार असून, लवकरच निर्णय अपेक्षित आहे.
भाजपवर टीका करताना सुळे म्हणाल्या, “काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणाऱ्या भाजपमध्ये आज सर्वाधिक काँग्रेस-राष्ट्रवादीचेच लोक आहेत. आमच्याकडे नवीन टॅलेंट आहे.” तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याबाबत चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“हे कार्यकर्त्यांचे निवडणूक आहे. टायगर अभी जिंदा है—शरद पवार आहेत आणि त्यांचा कोणताही कार्यकर्ता सोडला जाणार नाही,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. अदानी प्रकरणावर आपण काहीही वक्तव्य केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाला विनंती करत सुळे म्हणाल्या की, निवडणुकांमध्ये आमिषे व प्रलोभने दाखवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यात यावा. कार्यकर्त्यांची जबाबदारी आम्हीच घेतो; पवार साहेबांचा केंद्रबिंदू हा कार्यकर्ताच आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
