


विषय हार्ड न्यूज,पुणे (प्रतिनिधी,पायल पोटभरे):शहरासह राज्यभरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आम आदमी पार्टीने (आप) पुण्यात जोरदार तयारी सुरू केल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. पुणे शहरात सर्वप्रथम उमेदवारांची यादी जाहीर करून आपने आघाडी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
किर्दत म्हणाले, पहिल्या टप्प्यात २५ आणि त्यानंतर १६ उमेदवारांची अशी एकूण ४१ उमेदवारांची यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांची निवड कट्टर इमानदार, जमिनीवर काम करणारे आणि स्थानिक नागरिकांशी थेट संवाद असलेले कार्यकर्ते या निकषांवर करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या सर्व १६५ जागा लढवण्याचा आपचा निर्धार असून, पुणेकरांनी नेहमीच नव्या विचारांना स्वीकारल्याचा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेच्या लाभासाठी तयार होणाऱ्या आघाड्यांपेक्षा आप हा स्वच्छ, प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचा दावा त्यांनी केला.
उमेदवार निवडीबाबत बोलताना किर्दत म्हणाले, नागरिकांशी संवाद, स्थानिक पातळीवरील काम आणि प्रामाणिकपणा हेच आमचे मुख्य निकष आहेत. सध्याच्या राजकारणात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी राजकारणाचा ‘चिखल’ केला असून, त्यामुळे सामान्य जनतेचा विश्वास उडाल्याची टीकाही त्यांनी केली.
युतीच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडत किर्दत म्हणाले, महाराष्ट्रात आम आदमी पार्टी कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. सत्तेसाठी भूमिका बदलणाऱ्या पक्षांपेक्षा आप स्वतंत्र आणि ठाम भूमिका घेऊन निवडणुका लढवेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक कोंडी यांसारख्या सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम करणे हेच आमचे धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
