


विषय हार्ड न्युज,पुणे (प्रतिनिधी,पायल पोटभरे): राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने हालचाली वेगाने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर दत्तात्रय दनकवडे यांनी केला आहे.

दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून “ताई आणि दादा” यांच्यातही संवाद झाल्याचे धनकवडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडून आलेले उमेदवार घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवतील, असेही धनकवडे यांनी सांगितले. त्यामुळे दोन्ही गट एकत्र आल्यास निवडणूक चिन्हाबाबतचा संभ्रम दूर होणार असल्याचे चित्र आहे.
३८ क्रमांकाच्या प्रभागातील उमेदवारीचा तिढा देखील लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहराध्यक्ष प्रसाद जगताप, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात या विषयावर चर्चा झाली असून सर्व पातळ्यांवर एकमत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, राज्याच्या राजकारणात याचे पडसाद लवकरच उमटण्याची शक्यता आहे.
