


विषय हार्ड न्युज,पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची बैठक आज पुण्यात पार पडली. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सध्याच्या राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली.
शिंदे म्हणाले, “आज पुण्यातील बैठक पूर्ण झाली असून सर्व इच्छुक उमेदवार व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. पुण्यातून तब्बल २७७ इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. अनेकांना पक्षाकडून संधी मिळावी म्हणून अर्ज केलेले आहेत.”
पुणे महानगरपालिका निवडणुकीबाबत सध्या दोन मतप्रवाह असल्याची चर्चा सुरू आहे, यावर बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, “सध्या तरी महाविकास आघाडी म्हणूनच चर्चा सुरू आहे. नवे मित्र, जसे की मनसे, सोबत येऊ इच्छित असल्याची चर्चा आहे. अनेक पर्याय आहेत, मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.”
कोर कमिटीबाबत माहिती देताना ते म्हणाले, “आज संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत कोर कमिटी सर्व पक्षांबाबत चर्चा करून एकमताने निर्णय घेईल. त्यानंतर लवकरच अधिकृत निर्णय जाहीर केला जाईल. पवार साहेब, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि मी बसून अंतिम निर्णय घेऊ.”
अजित पवार यांच्याबाबत बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, “आतापर्यंत अजित पवार यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच आम्हीही कुणालाही प्रस्ताव दिलेला नाही. हे सर्व निर्णय राज्यस्तरावर होतील.”
स्थानिक पातळीवरील मतभेदांवर ते म्हणाले, “काही जण महाविकास आघाडी म्हणूनच लढावे असे म्हणत आहेत, तर काहींना दुसरा पर्याय खुला ठेवावा असे वाटते. किती जागा मिळाव्यात याचा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे. सन्मानजनक जागा मिळाव्यात ही अपेक्षा आहे.”
मुख्यमंत्री आणि गृहखात्यावर टीका करताना शिंदे म्हणाले, “सातारा परिसरात ड्रग्सचे कारखाने असतील तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. असे प्रकार घडत असतील तर पोलीस यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न निर्माण होतो. गृहखात्याने याची दखल घ्यावी. गृहखाते फेल ठरले आहे.”
भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “ते स्वप्नात आहेत. कुठल्याही पक्षाचे अस्तित्व असे संपत नाही. आधी त्यांनी स्वतःच्या पक्षातील स्थिती पाहावी. भाजपमध्येच तुमचे जुने नेते डावलले जात आहेत.”
एकूणच पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबाबत चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत शशिकांत शिंदे यांनी दिले.
