


विषय हार्ड न्युज,पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुक उमेदवारांची छाननी प्रक्रिया सुरू झाली असून, आज तब्बल १६५ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मनसेकडून ४९५ अर्ज वितरित करण्यात आले होते, त्यापैकी ३०० अर्ज जमा झाले आहेत, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली.
या मुलाखतींमध्ये उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, सामाजिक कामाचा अनुभव, जनसंपर्क, तसेच कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही याची काटेकोर तपासणी केली जात आहे. प्रत्येक उमेदवाराचा सविस्तर अहवाल तयार करून तो आदरणीय राज ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असून अंतिम उमेदवार निवड त्यांच्याच निर्णयानुसार होणार आहे, असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक कोणत्या मुद्द्यांवर लढवली जाणार, याबाबत विचारले असता मनसेकडून भाजपविरोधी भूमिका ठळकपणे मांडण्यात आली. भाजपने सत्तेचा माज दाखवत भ्रष्टाचार, भूखंड प्रकरणे आणि नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप करत, या सर्व मुद्द्यांविरोधातच ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच समोरच्या प्रतिस्पर्ध्याला सक्षमपणे टक्कर देऊ शकेल, अशाच उमेदवारांची निवड केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत चर्चा सुरू असल्याच्या बातम्यांवरही प्रतिक्रिया देण्यात आली. युतीसंदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू असल्याचे मान्य करताना, प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर निवडणुकीची तयारी करत असतो आणि मनसेचीही तयारी जोरात सुरू आहे, असे सांगण्यात आले.
महापालिका निवडणुकीसाठी मनसेने उमेदवार निवडीत काटेकोरपणा दाखवत, संघटनात्मक तयारीला वेग दिल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
