


विषय हार्ड न्युज,पुणे : महापालिकेची आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय हा वैयक्तिक असून त्याचा पक्षातील अंतर्गत घडामोडींशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करत माजी नगरसेवक विशाल तांबे यांनी पुढील काळात पक्षसंघटन आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.
गेल्या २१ वर्षांपासून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग असून अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. मात्र आता निवडणुकीतून बाहेर पडून संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “मी घेतलेली भूमिका ही पूर्णतः महापालिकेच्या दृष्टीने आहे. पक्षातील सुरू असलेल्या घडामोडींशी तिचा काहीही संबंध नाही,” असे तांबे यांनी स्पष्ट केले.
आपल्या प्रभागातील नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्याचे सांगत त्यांनी राजकीय संन्यासाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. “मी केवळ निवडणूक लढवणार नाही, राजकारणातून बाहेर पडतोय अशा चर्चा चुकीच्या आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत विश्वास व्यक्त करत तांबे म्हणाले, “निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, अशी मला खात्री आहे. महाविकास आघाडी म्हणूनही आमच्या बैठका सुरू आहेत. सकारात्मक आणि योग्य निर्णय लवकरच पाहायला मिळेल.” मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील आणि पवार साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
पक्षात फूट पडल्याच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचा उल्लेख करत, आगामी निवडणूक प्रक्रियेतही पक्षासाठी पूर्ण बांधिलकीने काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “निवडणुकीच्या काळात संघटनात्मक कामात आणि पक्षाच्या प्रक्रियेत मी सक्रिय असेन,” असे तांबे म्हणाले.
आपल्या निर्णयाची माहिती आपण आधीच वरिष्ठांना दिल्याचे सांगत, गेल्या चार वर्षांत निवडणूक कधी होणार याबाबतच अनिश्चितता असल्याने ही भूमिका मांडता आली नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
