


विषय हार्ड न्युज,पुणे : समाजसेवा, शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक बांधिलकीच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी गद्दुर्ग संवर्धन समिती दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराचे आयोजन करते. यंदाच्या समारंभात समितीने रवींद्र कृष्णचंद्र ठाकूर यांना “श्री स्वामी विवेकानंद राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार” प्रदान करून गौरविले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत सकारात्मक बदल घडविण्यासाठी ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा यामागे गौरव करण्यात आला.
भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर, वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकारी कर्नल श्रीकांत पुरोहित, समितीचे अध्यक्ष आणि तानाजी मालुसरे यांच्या वंशातील कुणाल दादा मालुसरे, तसेच माझी सैनिक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपकराजे शिर्के या मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. विविध संस्था, स्वयंसेवी संघटनांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि तरुण कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सन्मान सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सन्मान स्वीकारताना रवींद्र ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले,
“समाजाच्या आशा-आकांक्षांना साथ देण्याची प्रेरणा या प्रतिष्ठित पुरस्काराने मला अधिक दृढ केली आहे. माझ्या कार्याचा समाजाकडून असा गौरव होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पुढील काळात अधिक जबाबदारीने, सकारात्मकतेने आणि सेवाभावाने कार्य करण्याचा माझा संकल्प या सन्मानातून अधिक बळकट झाला आहे.”
समाजातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुढे आणण्याचा समितीचा उद्देश या कार्यक्रमातून ठळकपणे अधोरेखित झाला. अशी सन्मानपरंपरा समाजाला प्रेरणा देणारी ठरत असल्याचे मत अनेक उपस्थितांनी व्यक्त केले.
