


विषय हार्ड न्युज,नांदेड सिटी, पुणे : “
वंदे मातरम् १५० वर्षे” या ऐतिहासिक निमित्ताने नांदेड सिटीमध्ये उद्या, शनिवार दि. २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता अँफीथिएटर येथे भव्य प्रेरणादायी सांस्कृतिक संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिक, विद्यार्थी आणि कुटुंबांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार असून सर्वांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात आंतरराष्ट्रीय गायक विरेश चापते यांच्या राष्ट्रभावना जागवणाऱ्या विशेष संगीत मैफिलीने होणार आहे. ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ सादर होणारी ही प्रस्तुती देशभक्तीचे नवे भावविश्व उलगडणारी असेल. संगीताच्या माध्यमातून देशप्रेम जागृत करण्यासाठी ही मैफल महत्त्वाची ठरेल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
यानंतर IAS तुकाराम मुंढे यांचे थेट प्रेरणादायी व्याख्यान होणार असून शिक्षण, शिस्त, करिअर नियोजन, जीवनदृष्टी आणि युवा मार्गदर्शन या महत्त्वपूर्ण विषयांवर ते मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी, पालक आणि तरुणांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रशासनिक सूत्रांनी सांगितले.
कार्यक्रमात समाजकार्य, संस्कृती, कला, उद्यमशीलता आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा रत्न, मराठवाडा गौरव, मराठवाडा मित्र, समाज रत्न, उद्योग रत्न आणि गायक रत्न असे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक सोहळ्याचा समारोप ‘सांगता आकार’ संस्थेच्या महिलांच्या वंदे मातरम् सादरीकरणाने होणार आहे. नागरिकांनी कुटुंबांसह उपस्थित राहून या प्रेरणादायी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
