


तातडीची सुनावणी घेऊन “जैसे थे” आदेश; आवारात मंदिर आहे की नाही तपासण्याचे निर्देश…
विषय हार्ड न्युज,पुणे , २०ऑक्टोबर: मॉडेल कॉलनी येथील शेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंग (जैन बोर्डिंग) या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या जागेच्या विक्रीव्यवहाराला धर्मदाय आयुक्त, मुंबई यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा व्यवहार “जैसे थे” ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, बोर्डिंगच्या आवारात मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश सहधर्मदाय आयुक्त, पुणे यांना देण्यात आले आहेत.
ही सुनावणी आज (दि. २०) धर्मदाय आयुक्त अमोल कलोटी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रकरणात जैन बोर्डिंग बचाव कृती समितीच्या वतीने ॲड. सुकौशल जिंतूरकर, ॲड. योगेश पांडे, लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि प्रशांत बज यांनी याचिका दाखल केली होती. समितीच्या वतीने ॲड. पांडे यांनी प्रकरणाची बाजू मांडली.
ॲड. पांडे यांनी सुनावणीदरम्यान नमूद केले की, काही विश्वस्तांनी शासनाची दिशाभूल करून खोट्या कागदपत्रांवर आधारित जागेचा विक्री परवाना मिळविला आहे. तसेच बोर्डिंगच्या जागेत मंदिर नसल्याचे चुकीचे विवरण दाखवून बुलडाणा अर्बन आणि गिरेश्वर क्रेडिट सोसायटीकडून बोजा चढविण्यात आला आहे.
धर्मदाय आयुक्तांनी या पार्श्वभूमीवर प्रकरण गंभीर मानत २८ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश सहधर्मदाय आयुक्त, पुणे यांना दिले आहेत. त्या दिवशी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
“मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला” — लक्ष्मीकांत खाबिया…
जैन बोर्डिंग बचाव कृती समितीने गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. “जैन समाजावर अन्याय होऊ देणार नाही,” हे त्यांनी दिलेले आश्वासन आज प्रत्यक्षात उतरले, असे लक्ष्मीकांत खाबिया यांनी सांगितले.
जैन समाजाने मुख्यमंत्र्यांचे आणि त्यांचे निकटवर्तीय मिहिर कुलकर्णी यांचे आभार मानले आहेत. “हा आमच्या लढ्याचा पहिला टप्पा असून, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील,” असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
