विषय हार्ड न्यूज, धायरी, पुणे:सिंहगड रस्त्यावरील वडगावकडून स्वारगेटला जाणारा उड्डाणपूल मागील एक महिन्यापासून पूर्ण असूनही भाजप व पुणे महापालिकेकडून तो सुरू केला गेला नाही. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट पुलावरील बॅरिकेट्स काढून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला.
या कारवाईत मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, मयुरेश वांजळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांना रोखले आणि काहींना ताब्यात घेऊन सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.
यावेळी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. “पूल तयार असूनही नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीत अडकवून ठेवणे म्हणजे जनतेच्या सहनशीलतेची थट्टा आहे. महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे,” अशी संतप्त प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली.
मनसेने स्पष्ट इशारा दिला की, “पूल तातडीने सुरू करा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका व सत्ताधाऱ्यांची असेल.” तसेच, “एकाच पुलाचे दोन वेळा उद्घाटन करण्याचा दिखावा करून भाजप राजकारण करत आहे. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या खेळाला आता जनता फसणार नाही,” असा हल्लाबोल मनसे कार्यकर्त्यांनी चढवला.
मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंहगड रस्ता परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून, महापालिकेने आता तातडीने निर्णय घेतला नाही तर आगामी दिवसांत मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
