विषय हार्ड न्युज,धायरी, ता. पुणे – गौरी-गणपती उत्सवानिमित्त महिलांमध्ये पारंपरिक पोशाख आणि साडी नेसण्याविषयी उत्सुकता वाढावी, तसेच महिलांना आत्मविश्वासाने आणि आकर्षक पद्धतीने साडी परिधान करता यावी, या उद्देशाने गौराई साडी ड्रेपिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

ही कार्यशाळा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मा. रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस, खडकवासला विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सायली आशा सुधीर टिळेकर यांच्या पुढाकाराने धायरी व आंबेगाव येथे पार पडली.
या उपक्रमात विविध प्रकारच्या साडी नेसण्याच्या पद्धती दाखवण्यात आल्या. पारंपरिक नऊवारी साडीपासून ते आधुनिक पद्धतीपर्यंत सर्व प्रकार महिलांना शिकविण्यात आले. महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेमुळे उत्सव काळात महिलांना साडी नेसताना आत्मविश्वास तर मिळेलच, शिवाय सण अधिक रंगतदार होईल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाला आशा टिळेकर, लक्ष्मी प्रसाद, अर्चना मांडे, दामिनी मोरे, कविता कोकाटे यांसह अनेक मान्यवर आणि स्थानिक महिलांची उपस्थिती लाभली.
या उपक्रमामुळे समाजातील महिलांमध्ये ऐक्यभाव, आत्मनिर्भरता आणि पारंपरिक संस्कृतीविषयी अभिमानाची भावना वृद्धिंगत होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.