


विषय हार्ड न्युज,पुणे १८– नवले ब्रिज परिसरात रखडलेले बायपासचे काम आणि उध्वस्त सेवा रस्त्यांमुळे पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा, खड्डे आणि धोकादायक रस्त्यांमुळे प्रवाशांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. अपघातांचा धोका सतत डोक्यावर असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पुणे महापालिका आणि राज्यातील राजकारण्यांवर संतप्त स्वरूपात टीका केली आहे.
“रस्ते खड्ड्यांचे, प्रशासनाचा ढिसाळ कारभार”
“दररोज कोंडीत अडकून ऑफिसला उशीर होतो, गाड्यांचे नुकसान होते, पण प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसलंय. खड्ड्यांमुळे अपघात होतात तरी कुणालाच पर्वा नाही,” अशी तीव्र नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली.
“आश्वासनं देण्यात राजकारणी पुढे, पण कामात मागे”
नागरिकांचा आरोप आहे की, राजकारणी फक्त निवडणुकीच्या तोंडावर नवले ब्रिजवर फोटोसेशन करतात, पण प्रत्यक्ष काम होत नाही. “वर्षानुवर्षे फक्त घोषणा ऐकतोय, पण रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकटच होत चालली आहे. आम्हाला विकास नव्हे तर जगण्याइतकं सुरक्षित रस्ता द्या,” अशी जाहीर मागणी रहिवाशांनी केली.
प्रशासनाला नागरिकांची चपराक
NHAI आणि पुणे मनपाच्या निष्क्रियतेमुळे वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय, पर्यावरणीय प्रदूषण आणि जीवितहानी वाढली आहे. “खर्च वाढतोय, जीव धोक्यात घालून प्रवास करतोय आणि याची जबाबदारी घेणारा कोणीच नाही. हे जनतेशी सरळ अन्याय आहे,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.
तातडीने उपाययोजना करा
सेवा रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून रखडलेले बायपासचे काम पूर्ण करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
