संघटन विस्तार, सामाजिक उपक्रम व युवक सक्षमीकरणाला गती देण्याचा निर्धार.
विषय हार्ड न्युज,पुणे – शिंदे गट शिवसेनेच्या युवा सेनेत नवचैतन्याची लाट उसळली आहे. सोमनाथ कुटे यांची युवा सेनेच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी निवड होताच संघटन मजबूत करण्याचा आणि सामाजिक कार्याला गती देण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरदेसाई यांच्या हस्ते कुटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश बापू कोंडे आणि युवा सेनेचे नेते किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नवीन जबाबदारी स्विकारताना कुटे यांनी युवकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन बेरोजगारी निवारण, शिक्षणाची संधी, क्रीडा प्रोत्साहन, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण यावर ठोस काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागापासून शहरी केंद्रांपर्यंत संघटन विस्तारून पक्षाच्या विचारधारेची पेरणी करणे हे त्यांचे ध्येय आहे.

“युवा शक्ती ही राष्ट्राची खरी ताकद आहे. तिला योग्य दिशा देणे, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य असेल,” असे कुटे यांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे कार्यकर्त्यांत नवसंजीवनी निर्माण झाली असून, पुढील काळात युवकांसाठी रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक जनजागृती मोहिमा सुरू करण्याची तयारी आहे.