शास्त्री भवनात आज संध्याकाळी ४ वाजता केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय चर्चा.
विषय हार्ड न्युज,नवी दिल्ली, ता. ३१ जुलै :
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मंजूर निधी असूनही कामे अपेक्षेप्रमाणे न होण्याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी थेट केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर मंत्र्यांनी तत्काळ दखल घेत सांस्कृतिक खात्याचे सचिव, पुरातत्व खात्याचे महासंचालक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आज संध्याकाळी ४ वाजता शास्त्री भवन येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे.
संभाजीराजेंनी पुरातत्व विभागाच्या कामकाजातील अडथळ्यांविषयी माहिती दिली. रायगड विकास प्राधिकरणाने राज्य शासनामार्फत केंद्रीय पुरातत्व खात्याला निधी वर्ग केलेला असतानाही कामांमध्ये अपुरेपणा दिसतो, अशी तक्रार त्यांनी मांडली. रायगड किल्ल्यासाठी ११७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील ११ कोटी रुपये २०१८ मध्येच खात्याला देण्यात आले होते. मात्र आजपर्यंत हा निधीही पूर्णपणे खर्च करण्यात आलेला नाही.
यामुळे किल्ल्यावरील वास्तूंच्या संवर्धनाची कामे रखडल्याचे चित्र आहे. रायगड विकास प्राधिकरणालाही विविध तांत्रिक आणि प्रशासनिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गजेंद्र शेखावत यांनी तातडीने बैठक घेण्याचा निर्णय घेतला असून, रायगड संवर्धनासाठी ठोस कृती आराखडा ठरवण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.