मराठी घोषणांचा अभाव, खराब खुर्च्या, ओल्या बॅगा, सोन्याचे दागिने गायब – खर्डेकर यांनी मांडले गंभीर मुद्दे.
विषय हार्ड न्युज, पुणे, मुंबई : – इंडिगो विमान कंपनीच्या सेवेतील सातत्यपूर्ण त्रुटींवर प्रवाशांचा संयम सुटू लागला आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी केंद्रीय नागरी उड्डाण व सहकारिता राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे तक्रार निवेदन सादर करत कंपनीच्या व्यवस्थापनाला झटका दिला आहे.
खर्डेकर यांनी स्वतः अनुभवलेल्या त्रासांची सविस्तर माहिती देत संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.

मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत :
बिघडलेल्या सीट्स : मुंबई–नैरोबी विमानप्रवासात खुर्ची झुकवता न आल्याने त्रास झाला. हवाईसुंदरींच्या मदतीशिवाय सीट व्यवस्थित झाली नाही.
ओल्या बॅगा : मुंबई विमानतळावर बॅगेज बेल्टवर बॅगा पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत मिळाल्या. कंपनीकडून कोणतीही खबरदारी नव्हती.
दागिने गायब : नातेवाईकाच्या बॅगेतील नेकलेस चोरीस गेला, पण इंडिगोने केवळ ₹2000 नुकसानभरपाई देत जबाबदारी झटकली.
सीट अलॉटमेंटमध्ये अकार्यक्षमता : नवरा–बायकोला वेगवेगळ्या जागा देण्यात आल्या. विनंती करूनही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीचा प्रत्यय आला.
सूचनांसाठी मराठीचा वापर नाही : महाराष्ट्रातील प्रवास असूनही ना घोषणांमध्ये मराठी, ना कर्मचाऱ्यांकडून मराठीत संवाद.
बॅगेज हाताळणीची हलगर्जी पणा: महागड्या बॅगांना पोच पडत असून पोर्टर कर्मचाऱ्यांकडून बेजबाबदारपणा हाताळणे सुरू आहे.
खर्डेकर यांनी विमान प्रवास सुरक्षित व सुखद करण्यासाठी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समज देण्याची आणि प्रवाश्यांच्या तक्रारी गंभीरपणे घेण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडून लवकरच कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.