राजकीय दबाव असूनही पोलिसांची तत्पर कारवाई; चौकशीस वेग.
विषय हार्ड न्युज, दौंड,पुणे – दौंड तालुक्यातील वाखारी गावच्या हद्दीत असलेल्या न्यू अंबिका कला केंद्र येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी बाळासाहेब मांडेकरसह इतर तिघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुण्यातून ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली.
ही धक्कादायक घटना २१ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली होती. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे बाळासाहेब मांडेकर हा एका आमदाराचा भाऊ असल्याने या घटनेला राजकीय वळण मिळाले होते. प्रारंभी ही घटना दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात होते. मात्र, प्रसारमाध्यमांमधून ही बाब समोर आल्यानंतर यवत पोलीस सतर्क झाले आणि तत्काळ हालचाली सुरू केल्या.
या प्रकरणी न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत अखेर मुख्य आरोपीसह इतर तिघांना अटक करण्यात यश मिळवले.
सध्या अटक केलेल्या आरोपींना यवत पोलीस ठाण्यात अधिक तपासासाठी ठेवण्यात आले असून, उर्वरित आरोपींचा शोध आणि गोळीबारामागील नेमकं कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील पुढील तपास गतीने करण्यात येत आहे.