पुण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावाची विटंबना; हीच का विकसनशील भारताची प्रगती?
विषय हार्ड न्युज,म्हसरबुद्रुक (ता. भोर), १५ जुलै:
एकीकडे पुणे मेट्रो धावते आहे, नवीन विमानतळांचे आराखडे आखले जात आहेत, हायवेवर बुलेट ट्रेनचे स्वप्न रंगवले जाते… आणि दुसरीकडे, फक्त ५०ते ६०किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये अजूनही रस्ता नाही म्हणून ९० वर्षांच्या आजीला डालात टाकून ३ किलोमीटर पायपीट करावी लागते — हा विरोधाभास जर प्रगती मानायचा असेल, तर ‘विकसनशील’ ही संज्ञा किती कालबाह्य झाली आहे, हे स्पष्ट होते.

भोर तालुक्यातील म्हसरबुद्रुक गावापासून सुमारे ३ किमी डोंगरात वसलेल्या शिंदेवस्तीतील जाईबाई कोंडीबा शिंदे (वय ९०) यांना आज सकाळी पॅरालिसिसचा झटका आला. मात्र, रस्ताच नसल्यानं आणि चिखलामुळे कोणतेही वाहन जात नसल्याने, कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्यांना डालात ठेवून भर पावसात तीन किलोमीटर पायपीट केली. तब्बल दीड तासाने त्यांना मुख्य गावात आणून खासगी वाहनाने भोर ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले.
या वस्तीमध्ये २५ घरे असून, आजही डोंगराळ आणि कच्चा मार्गच संपर्काचे एकमेव साधन आहे. पावसाळ्यात येथे दळणवळण पूर्णतः ठप्प होते. अशा अवस्थेत कोणालाही आजारपण, अपघात किंवा प्रसूती झाली, तर त्याला डोली, डाल किंवा हातावर घेऊन गावात आणावे लागते. यात वेळही जातो आणि जीव धोक्यात येतो.
सरपंच एकनाथ म्हसुरकर म्हणाले, “ही काही दुर्गम आदिवासी पट्ट्यातील गोष्ट नाही. पुण्याजवळच ही अवस्था आहे हेच धक्कादायक आहे. शिंदेवस्तीला तत्काळ पक्का रस्ता मंजूर करावा.“
प्रश्न विचारणारा संदर्भ:
शहरात स्मार्ट सिग्नल्स, मल्टीलेव्हल पार्किंग, मेट्रो फीडर बस आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन येत असताना — ज्या गावांनी स्वातंत्र्यानंतर सात दशकं वाट पाहिली, त्यांना आजही रस्ता का नाही? हा विकसनशील भारत म्हणवून घ्यावा की वंचित भारत म्हणून पुन्हा तपासावा?
डोंगरावरचा एक रस्ता नसतो म्हणून जेव्हा एखादी वृद्ध महिला जीवाच्या झगड्यातून जात असते, तेव्हा केवळ तिच्या घरच्यांचेच नाही तर व्यवस्थेचंही अपयश उघड होतं.