मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 75 हून अधिक क्रीडा संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरण.
विषय हार्ड न्युज,पणजी, 15 जुलै 2025 :
गोव्यातील क्रीडा क्षेत्राला गती देण्यासाठी आणि नवोदित खेळाडूंना आर्थिक संजीवनी देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते राज्यातील विविध क्रीडा संघटना, क्लब्स आणि वैयक्तिक खेळाडूंना अनुदानाचे धनादेश आज वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयाच्या सभागृहात उत्साही वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात गोवा ऑलिम्पिक असोसिएशनसह 46 क्रीडा संघटना, 22 क्लब्स आणि 7 प्रतिभावंत वैयक्तिक खेळाडूंना आर्थिक सहाय्य लाभले. 120 हून अधिक प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

“खेळ हे केवळ शरीराचे नव्हे, तर मनाचेही बळ वाढवतात. गोव्यातील प्रत्येक युवकाने क्रीडाक्षेत्रात उतरण्याची गरज आहे,”
— मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनंतर नवीन क्रीडा संस्कृतीचा प्रारंभ झाला आहे. भारताच्या 2036 ऑलिम्पिक मोहिमेत गोव्याचे खेळाडू झळकावेत यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
५०% अनुदान त्वरित, उर्वरित ऑगस्टमध्ये
सरकारने सध्या 50 टक्के अनुदान वितरित केले असून, उर्वरित रक्कम ऑगस्ट महिन्यात देण्यात येईल. ज्या संघटनांकडे स्वतःची क्रीडासुविधा नाही, त्यांनी स्थानिक खेळाच्या जागा ओळखून सरकारशी संपर्क साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी सुचवले.
SAGच्या पुढाकाराने आयोजन
कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा प्राधिकरण गोवा (SAG) यांच्यावतीने करण्यात आले होते. या प्रसंगी क्रीडा सचिव संकल्प आमोणकर, क्रीडा संचालक, SAG अधिकारी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि असंख्य खेळाडू उपस्थित होते.

विशेष उल्लेखनीय:
▪️ राज्यात क्रीडाक्षेत्राला व्यावसायिक आणि जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी सरकारकडून भक्कम पायाभूत सुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळण्यास प्रारंभ
▪️ नवोदित खेळाडूंसाठी स्थानिक पातळीवर चाचणी व निवड प्रक्रिया सुरू करण्यावर भर
▪️ युवकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे सरकारचे दीर्घकालीन उद्दिष्ट
