विषय हार्ड न्युज,पुणे | ८ जुलै २०२५ :
NET, SET आणि Ph.D. पात्रता असूनही वर्षानुवर्षे बेरोजगारीचे दाहक वास्तव सहन करणाऱ्या प्राध्यापकांना अखेर दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या ५०१२ प्राध्यापक पदे भरण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.
हा निर्णय ‘नेट-सेट, पीएच.डी. धारक संघर्ष समिती’च्या सततच्या आंदोलन आणि प्रयत्नांचा मोठा विजय मानला जात आहे.शासन निर्णय (GR) लवकरच जाहीर करण्यात येणार असून, त्याआधी समितीचा संघर्ष थांबणार नसल्याचे ठाम मत समितीने मांडले आहे.

संघर्षाची कहाणी :
संघर्ष समितीने गेल्या वर्षभरात पुणे व मुंबईसह अनेक ठिकाणी आंदोलनांचे आयोजन केले. बेरोजगारी, तासिका तत्वावरील अन्याय, आणि शासनाच्या उदासीन धोरणांवर लक्ष वेधण्यासाठी समितीने ९ वेळा बेमुदत सत्याग्रह आंदोलन केले.
महत्वाच्या आंदोलनांमध्ये –
• २४ जून २०२४ – बेमुदत सत्याग्रह-६ (पुणे)
• १ ते ९ ऑगस्ट – ‘बेरोजगाराच्या वारी मुख्यमंत्र्यांकडे’
• २५ सप्टेंबर – सामूहिक आत्महत्या आंदोलन (सातारा)
• ७ एप्रिल २०२५ पासून – बेमुदत सत्याग्रह-८
• २८ जूनपासून – चालू असलेले बेमुदत सत्याग्रह-९ (मुंबई)
या काळात समितीच्या कार्यकर्त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण संचालनालय, कुलगुरू, मुख्यमंत्री, मंत्री यांच्याशी थेट संवाद साधला आणि विविध माध्यमातून प्रश्न मांडले.
संघर्षामागची वेदना आणि अभिमान :
या लढ्याच्या केंद्रस्थानी होते ते शोषित, पात्र आणि मेहनती प्राध्यापक, जे उच्चशिक्षित असूनही CHB तत्त्वावर अत्यल्प मानधनावर काम करत होते. त्यांच्या आवाजाला धार देण्यासाठी संघर्ष समितीने झगडले. मात्र, “ज्यांच्यासाठी लढा दिला, त्यांचाच संख्याबळ आणि पाठिंबा अपुरा राहिला,” अशी खंतही समितीने मांडली. तरीही, “ज्यांनी सर्व अडचणींवर मात करून झुंज दिली, त्या मावळ्यांचा आम्हाला अभिमान आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी व्यक्त केले.
समितीचा इशारा आणि आवाहन :
शासनाने तत्त्वतः मान्यता दिली असली तरी शासन निर्णय जाहीर होईपर्यंत आणि भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा समितीने दिला आहे.आगामी काळात NET/SET, Ph.D. धारक बेरोजगार आणि CHB प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, हा लढा केवळ नोकरीचा नसून शिक्षणातील समानतेचा आहे, हे लक्षात घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले.
शेवटचा शब्द :
ही भरती केवळ नोकरी मिळवण्याची संधी नाही, तर संघर्षाच्या, एकजुटीच्या आणि हक्कासाठी झगडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याभिमुख शिक्षकाच्या स्वाभिमानाचा विजय आहे.
“शिकलेलं पण थांबलेलं’ आयुष्य अखेर चालू होणार – हीच खरी बातमी”!
” हाच लढा शिक्षकांचा, हाच विजय शिक्षणाचा”!