विषय हार्ड न्युज,कापूरहोळ, ता. भोर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कापूरहोळ भोर फाटा येथे महिन्याभरापासून पडलेला जीवघेणा खड्डा नागरिकांच्या जिवावर उठला असून, याकडे नॅशनल हायवे अथॉरिटी आणि रिलायन्स कंपनीचे अधिकारी ठाम दुर्लक्ष करत आहेत. हा फाटा तीन तालुक्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा जंक्शन असूनही रस्त्यांची अवस्था दयनीय आहे.

साताऱ्याहून पुण्याकडे येताना उड्डाणपुलाखाली, तसेच भोरकडून येणाऱ्या वाहनांसाठीच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. स्थानिक सरपंच पंकज गाडे यांनी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही कारवाई झालेली नाही. अधिकारी ‘आज-उद्या’ करतो म्हणत वेळकाढूपणा करत आहेत.
पुण्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर, विशेषतः हॉटेल बालाजी समोर, पडलेला खड्डा प्रवाशांसाठी सापळा ठरत आहे. नागरिकांचा रोष वाढत असून, “लोक मेले तरी चालतील, पण खड्डे भरायचे नाहीत,” ही प्रशासनाची भूमिका असल्याचा संताप व्यक्त होतोय.
रिलायन्स आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असताना, निष्पाप नागरिक मात्र अपघातात बळी पडत आहेत. आता या रस्त्यांवरून हॉस्पिटल्सचे बॅनरच दिसत असून, अपघातांवरच अर्थकारण उभे राहत आहे, अशी प्रवाशांची उपरोधिक प्रतिक्रिया आहे.
जर तातडीने खड्डे बुजवले नाहीत, तर सरपंचांसह नागरिक खड्ड्यांवरच ठिय्या आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.