विषय हार्ड न्युज,खडकवासला,(प्रतिनिधी) – पुणे महापालिकेच्या किरकटवाडी शाळेत पारंपरिक वारकरी पद्धतीने आयोजित करण्यात आलेला पालखी सोहळा हरिनामाच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागात भक्तिभावाने पार पडला.
या सोहळ्याला किरकटवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोकुळ निवृत्ती करंजावणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीतील संतोष बांदल, प्रवीण दिघे, जयश्री पठारे, दीपाली सावंत, तसेच अनेक पालक व ग्रामस्थ बंधु-भगिनींनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.ढोल-ताशा व लेझीम पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी वारकरी वेष परिधान करून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीची मिरवणूक सुरु केली. विद्यार्थिनींनी नऊवारी साडी घालून भजनात सहभाग घेतल्याने वातावरण अधिकच भक्तिमय झाले.
प्रत्येक वर्गाच्या दिंड्यांमधून ‘हरि बोल’चा जयघोष घुमत राहिला. शाळेच्या प्रांगणातून सुरु झालेली ही पवित्र मिरवणूक गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आनंदात पोहोचली.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांचा आत्मीय सहभाग व शिक्षक वर्गाची निष्ठा आणि मेहनत. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. संगीता कुरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी निरगाठे सर, सोनवणे मॅडम, जाधव सर, थोरात मॅडम, कदम सर आदींच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाची खरी अनुभूती दिली.
पालकांच्या उपस्थितीने उत्साह द्विगुणित झाला, तर पावसाच्या हलक्या सरींनी जणू या भक्तिपर्वाची साक्ष दिली.
वारकरी परंपरेतील शिस्त, भक्तीभाव, परंपरा आणि संस्कृती यांचा संगम विद्यार्थ्यांना अनुभवता आला. शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कारांची ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये रुजली असल्याचे चित्र या सोहळ्यामुळे दिसून आले.