गौरव मालक यांचा शासनाला निर्वाणीचा इशारा; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा तीव्र होणार
विषय हार्ड न्युज,पुणे (प्रतिनिधी) –
राज्यात महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया जोमात सुरू असून ग्रामीण भागांतील असंख्य दिव्यांग विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये दाखल होत आहेत. मात्र, या शहरांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

“घरची आर्थिक स्थिती हलाखीची असून शहरात येऊन हॉस्टेल न मिळाल्यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होते,” अशी खंत दिव्यांग विद्यार्थी प्रतिनिधी गौरव मालक यांनी व्यक्त केली. त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की,
“येणाऱ्या ३० जुलैपर्यंत स्वतंत्र दिव्यांग वसतीगृह सुरू न केल्यास राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांसह आम्ही दिव्यांग कल्याण आयुक्तालयाबाहेर अन्नत्याग उपोषण छेडू!”
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी तातडीने स्वतंत्र वसतीगृहांची व्यवस्था करण्यात यावी, अशी जोरदार मागणीही त्यांनी केली आहे. याप्रकरणी शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा गौरव मालक यांनी दिला आहे.