• शिवरायांचे पहिले सरसेनापती पण नामफलक बेपत्ता! – पुणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षावर संताप.
विषय हार्ड न्युज,पुणे (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले सरसेनापती आणि पानशेत जलाशयाचे नाव ज्यांच्यावरून ठेवण्यात आलेले आहे, अशा वीर बाजी पासलकर यांच्या नावाने वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात उड्डाणपूल व चौकाचे नामकरण करण्यात आले आहे. मात्र अलीकडील काळात या परिसरातील सर्व साइनबोर्ड हटवले गेले असून, ते अद्याप पुन्हा बसवले गेलेले नाहीत. यामुळे स्थानिक रहिवासी आणि 84 मोसे खोऱ्यातील पासलकर कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिक आणि वीर बाजी पासलकर यांच्या वंशजांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेने रस्त्याचे डांबरीकरण आणि दुरुस्ती करताना सर्व साईनबोर्ड हटवले, मात्र ते नीट जपून ठेवले गेले नाहीत. काही बोर्ड कचऱ्यात फेकलेले आढळले. वर्षानुवर्षे या चौकात वीर बाजी पासलकर यांचा इतिहास जपणारे हे बोर्ड लावले जात होते, जे इतिहासप्रेमींसाठी, नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठीही माहितीपूर्ण होते.
८४ मोसे खोऱ्यातील संपूर्ण पासलकर कुटुंबीयांच्या वतीने ‘शिवा पासलकर’ (मो. 09326425858) यांनी महानगरपालिकेला निवेदन सादर केले असून, या सर्व बोर्ड चौकाच्या चारही दिशांना लवकरात लवकर पुन्हा लावण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“वीर बाजी पासलकर हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. महानगरपालिकेने त्यांचा आदर राखावा आणि या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी, ही आमची नम्र विनंती आहे,” असे आवाहन त्यांनी केले.