विषय हार्ड न्युज,धायरी/नऱ्हे: धायरीतील महेश्वरी प्रांगण स्कूल आणि श्री कंट्रोल चौकाजवळील समृद्धी महेश्वरी स्कूल या दोन्ही शाळांमध्ये पारंपरिक उत्साहात पालखी रिंगण सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांसोबत महिला पालकांनीही रिंगणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आनंद द्विगुणित केला.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठलभक्तीने भारलेली शाळा! एरवी गणवेशात दिसणारी मुले गांधी टोपी, कपाळावर बुक्का, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ, तर मुलींनी नऊवारी साडी, डोक्यावर तुळस अशा पारंपरिक पोशाखात उपस्थित होऊन पालखीचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनात्मक बॅनर हातात घेऊन स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, भक्ती आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेतील परिसर फुलांनी सजवण्यात आला होता, तर ढोल-ताशांच्या गजरात पालखी रिंगणात फिरवण्यात आली.
शाळेच्या व्यवस्थापनाने आणि शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शाळेतील अध्यापक व पालक यांच्यातील सहभाग आणि एकात्मता या कार्यक्रमातून प्रकर्षाने जाणवली.
महेश्वरी प्रांगण आणि समृद्धी महेश्वरी स्कूलने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, वारसा आणि भक्तीभाव वृद्धिंगत करण्याचा उपक्रम राबवत वारंवार एक सकारात्मक उदाहरण समोर ठेवले आहे.