विषय हार्ड न्युज,भोर, ता. १९: भोर-महाड राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण सुरू असताना पर्यायी भोर-निगुडघर-हिर्डोशी मार्गावर अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विशेषतः नांदगाव परिसरात पर्यायी रस्त्यावर कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना न केल्यामुळे वाहनधारक अडचणीत सापडत आहेत. बुधवारी (ता. १८) एका मोटारीने थेट मोरीत उतरत गंभीर नुकसान सोसले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र भविष्यातील मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चेतावणी देणारे रिफ्लेक्टर, फलक, किंवा अडथळे न लावल्यामुळे अनेक वाहनधारकांना मोरीतील खड्डे आणि धोकादायक वळणांची कल्पनाही लागत नाही.
सचिन देशमुख, सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्सचे सदस्य सांगतात, “नांदगाव येथील मोरीच्या खड्ड्यात अडकलेली मोटार आम्ही बाहेर काढली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कोणताही इशारा नसल्यामुळे दररोज धोका वाढतो आहे. ठेकेदाराने त्वरित उपाययोजना कराव्यात.”
नागरिकांचा रोष आता वाढत असून, “एखादा जीव गमावल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही.
Date:
नांदगाव मोरीत मोटार अडकली, जीवितहानी टळली – भोर-हिर्डोशी मार्ग अपघाताच्या कचाट्यात; प्रशासनाची झोप उडणार कधी?
- Advertisement -