


विषय हार्ड न्युज पुणे:वसुंधरा फाउंडेशनने सातारा जिल्ह्यातील अंधारी कास येथील कासाई देवी विद्यालय या रहिवासी शाळेत “गोदान” हा आगळा-वेगळा उपक्रम राबवून एक समाजाला दिशा देणारे उदाहरण उभे केले आहे. या उपक्रमातून संस्थेने इतर सामाजिक संस्थांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

संस्थेचे संस्थापक धनंजय भोसले यांनी या संकल्पनेची मांडणी करताना समाजात गरजूंना नेमकं काय द्यावं आणि काय देऊ नये, याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, गोदानामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांना सुदृढ शरीर, शुद्ध अन्न व शुद्ध विचार मिळावा.
रहिवासी शाळांमध्ये अनेक वेळा मूलभूत गोष्टींची टंचाई भासते. याच पार्श्वभूमीवर वसुंधरा फाउंडेशनने एक गाय देऊन शाळेला दूध व जैविक शेतीसाठी उपयोगी शेणखत व गोमूत्र मिळावे, असा हेतू ठेवला. यामुळे मुलांना दररोज एक ग्लास ताजं दूध मिळेल आणि रासायनिक खतांपासून दूर राहून शुद्ध भाजीपाला खाण्याची सवय लागेल.
हा उपक्रम केवळ पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील इतर भागांमध्येही विस्तारत आहे. वसुंधरा फाउंडेशनच्या कामामध्ये आता अनेक हात सामील होत असून, ही संस्था एक वटवृक्ष होण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
यावेळी संतोष परदेशी,अरुण सुर्वे, तुषार बालगुडे, अभिजीत पाठक , विजय भोसले, निरंजन बंडेवार, तसेच कासाई देवी विद्यालयाचे मुख्याध्यापक शेलार यावेळी उपस्थित होते.

• गोदान उपक्रमातून वसुंधरा फाउंडेशनचा शुद्ध अन्न व आरोग्याचा संकल्प
• एक गाय, एक ग्लास दूध, आणि एक नवा समाजदृष्टिकोण.
