वडगाव खु. येथे संपन्न झालेल्या दरबारात शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन, नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ निर्णय; महिलांचा मोठा सहभाग
विषय हार्ड न्युज,पुणे:राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला “जनता दरबार” दिनांक २१ मे २०२५ रोजी वडगाव खु. येथील स्व. सुषमा स्वराज महिला बचत गट प्रशिक्षण केंद्रात यशस्वीरीत्या पार पडला.

या दरम्यान परिसरातील महिलांनी व नागरिकांनी आपल्या भागातील समस्या, अडचणी, शासकीय योजनांविषयी गैरसमज व अंमलबजावणीतील अडथळ्यांबाबत मोकळेपणाने संवाद साधला. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठीच्या योजनांविषयी देखील माहिती देण्यात आली. विशेषतः घरगुती हिंसाचार, निवारा, पेन्शन, आरोग्य सुविधा, शिक्षण, व्यवसाय यांसारख्या विषयांवर उपस्थित अधिकाऱ्यांनी थेट उत्तरं दिली.
दरबारात प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने नोंद घेऊन संबंधित विभागांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, याची हमी देण्यात आली.
या कार्यक्रमात सिंहगड रोड, नांदेड सिटी, हवेली आणि राजगड पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी, पुणे मनपाचे सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक आयुक्त, हवेली पंचायत समितीचे अधिकारी, आणि महिला विभागाशी संबंधित प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमाला खडकवासला परिसरातील महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
रूपाली चाकणकर यांनी सांगितले की, “महिलांच्या समस्या ऐकून त्यावर ठोस उपाय शोधण्याचा उद्देश या दरबारामागे आहे. प्रशासन व जनता यांच्यातील संवाद सशक्त होणे, हीच खरी लोकशाही आहे.”
“समस्यांवर तोडगा – संवादातूनच!”
आपल्या सहभागातूनच समाधानाची दिशा ठरते!
