“घराघरात मानवी मुखवट्या मागे लपलेल्या राक्षसी प्रवृत्ती.
विषय हार्ड न्युज,पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांच्या सूने वैष्णवी हगवणेच्या मृत्यूमागे आत्महत्या नसून खून झाल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. १६ मे रोजी वैष्णवीने गळफास घेतल्याचे प्रथम सांगण्यात आले होते, मात्र तिच्या शरीरावरील जखमा आणि बी.जे. वैद्यकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
अहवालानुसार, वैष्णवीच्या मृत्यूचं मुख्य कारण गळ्याभोवतीचा फास असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मात्र तिच्या शरीरावर धारदार वस्तूने मारहाणीच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत, ज्यामुळे तिच्या मृत्यूच्या स्वरूपावर संशय वाढला आहे.
वैष्णवीने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी छळाला कंटाळून विष घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. ती सतत होणाऱ्या मानसिक त्रासामुळे हतबल झाली होती, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. प्रकरणात समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवीने तिच्या मैत्रिणीला चारित्र्यावरच्या आरोपांबद्दल, हुंड्यासाठी होणाऱ्या मागण्यांबद्दल आणि शारीरिक-मानसिक छळाबद्दल सांगितले आहे.
या क्लिपनुसार, तिचा पती शशांक हगवणे याने वैष्णवीच्या वडिलांकडे तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यामुळे तिला धमकावण्यात आले आणि काही काळ माहेरी पाठवण्यात आले होते. काही दिवसांनंतर ती परत सासरी गेली, मात्र छळ सुरूच राहिला.
१६ मे रोजी वैष्णवी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तिच्या मृत्यूनंतर पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, नेते राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत.
राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. वैष्णवीच्या वडिलांच्या आरोपांनुसार, प्रेमविवाहानंतर सुरू झालेल्या संशयाच्या भोवऱ्यात या तरुणीला जीव गमवावा लागला आहे.
