रेकोर्डवरील गुन्हेगाराकडून फोनवर धमकी; काही तासांतच थेट हल्ला, पोलीस तपासात गुन्हेगार फरार
विषय हार्ड न्युज,पुणे, २० मे :
शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश घारे यांच्या कारवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची थरारक घटना मंगळवारी रात्री उशिरा गणपती माथा परिसरात घडली. विशेष म्हणजे, याआधीच एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने घारे यांना फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. काही तासांतच या धमकीनंतर गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११.३० वाजता निलेश घारे आपल्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते. त्यांच्या काळ्या रंगाच्या क्रेटा गाडी (क्रमांक MH-12 **) कार्यालयाबाहेर पार्क केली होती. याचदरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागच्या सीटवर असलेल्या इसमाने थेट त्यांच्या कारवर गोळीबार केला. गोळी काचेला लागली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, स्थानिक पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी तातडीने दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून त्यात दोघेजण हेल्मेटसह दुचाकीवरून येताना आणि गोळी झाडताना स्पष्टपणे दिसून येत आहेत.
फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून गोळ्या, काचांचे अवशेष आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात हे कृत्य पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत असून, पोलीस संबंधित रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.
दरम्यान, निलेश घारे यांनी काही वर्षांपासून आपल्या जिवाला धोका असल्याची शक्यता व्यक्त करत पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. मात्र अद्याप त्यांना तशी सुरक्षा उपलब्ध झालेली नाही.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, “घारे यांनी यापूर्वी धमकीचा फोन मिळाल्याची तक्रार वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर काही तासांतच गोळीबार झाल्यामुळे आम्ही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, गुन्हेगार लवकरात लवकर गजाआड होतील, यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न सुरु आहेत.”
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.