विषय हार्ड न्युज,पुणे : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर संपूर्ण समाजावर खोल आघात करणारी होती. अशा कठीण प्रसंगी देशमुख यांची कन्या वैभवी हिने ज्या प्रकारे स्वतःला सावरत शिक्षणात मन लावले, ते खरं तर हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.
वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची एकमेव जिद्द मनात ठेवून वैभवीने बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं. तिच्या या यशाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केलं असून त्यांनी वैभवीला पत्र पाठवून तिच्या जिद्दीला सलाम केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे, “अतिशय कठीण काळात तू संयम ठेवून उत्तम यश मिळवलं आहेस. तुझ्या वडिलांना तुझा अभिमान वाटला असता. तू इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरली आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा सदैव राहील.”
वैभवीने इंग्रजी – ६३, मराठी – ८३, गणित – ९४, फिजिक्स – ८३, केमिस्ट्री – ९१ आणि बायोलॉजी – ९८ असे एकूण ५१२ गुण मिळवत आपल्या कष्टाचं चीज केलं आहे. वडिलांच्या जाण्याने आलेल्या मानसिक तणावातून सावरत, तीने जिद्दीने वाटचाल केली.
पहिल्या पेपरनंतर माध्यमांशी बोलताना तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. “पेपरच्या वेळी वडील आठवत होते, मनात गोंधळ होता, पण मी ठरवलं – त्यांचे स्वप्न पूर्ण करायचं,” असं ती म्हणाली.
वैभवीचा हा संघर्ष आणि यश समाजातील असंख्य मुला-मुलींना कठीण प्रसंगीही हार न मानता उभं राहण्याचं बळ देईल, यात शंका नाही.
Date:
वडिलांच्या आठवणींचा आधार घेऊन वैभवीने उंच भरारी घेतली – ८५.३३% गुणांसह तिचं स्वप्नवत यश!
- Advertisement -