गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आंबा महोत्सव सुरू; महिला बचत गटांचेही आकर्षक स्टॉल्स, महोत्सव ३१ मे पर्यंत.
विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २ एप्रिल २०२५ : महाराष्ट्रात आंब्याचा हंगाम सध्या बहरात आहे. मात्र, तांत्रिक विकास आणि शहरीकरणाच्या झपाट्यामुळे पारंपरिक आमराया नामशेष होत चालल्या आहेत. त्यामुळे दर्जेदार आणि गावरान आंबा मुख्यतः कोकणातच उपलब्ध आहे. अशा पार्श्वभूमीवर पुणेकरांना थेट कोकणातून हापूस आणि इतर दर्जेदार आंबा रास्त दरात मिळावा, यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये ‘आंबा महोत्सव’ आजपासून (१ एप्रिल) सुरू झाला असून, तो ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. ‘उत्पादक ते थेट ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

शेतकऱ्यांना बाजारभाव, ग्राहकांना रास्त दर
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आंबा विक्री व्यवस्थेतील दलाल किंवा मध्यस्थ टाळण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळणार असून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा आंबा कमी दरात उपलब्ध होणार आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ यांनी सांगितले की, हा उपक्रम यापुढे दरवर्षी आयोजित केला जाणार आहे.
महिला बचत गटांचा सहभाग लक्षवेधी
या महोत्सवात ‘उमेद अभियानांतर्गत’ महिला बचत गटांनी तयार केलेल्या गावरान वस्तू व खाद्यपदार्थांचाही समावेश आहे. यासाठी एकूण ६० स्टॉल्सपैकी १५ स्टॉल्स महिला गटांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे पुणेकरांना ग्रामीण भागातील पारंपरिक चविष्ट पदार्थांची चव घेण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या उपक्रमाचा पुणेकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे म्हणाले की, “महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या महोत्सवाचा दुय्यम पण महत्त्वाचा हेतू आहे.”
शहरात आणखी तीन ठिकाणी आंबा महोत्सव
पणन महामंडळातर्फे याशिवाय शहरात आणखी कोथरूड (गांधी भवन), हडपसर (मगरपट्टा) आणि खराडी या ठिकाणी स्वतंत्रपणे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.