विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २५ मे : पोलीस ठाणे ही फक्त चौकट नसून ती जनतेच्या विश्वासाची शिखर वास्तू असावी, अशी अपेक्षा आजच्या प्रशासनाकडून आहे, असे मत उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासन पोलिसांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या नव्या वास्तूमधून पारदर्शक प्रशासन करावे आणि नागरिकांशी विश्वासाने, संवेदनशीलतेने वागावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. ही इमारत म्हणजे फक्त सिमेंट-विटांचा ढांचा नसून, ती जनतेच्या सुरक्षेचे प्रतीक असावी, असे ते म्हणाले.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बावधन पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीबाबत सविस्तर माहिती दिली. नागरिकांना जलद व सुलभ सेवा देण्यासाठी आवश्यक ते सर्व आधुनिक तंत्रज्ञान, सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
बावधनसारख्या जलदगतीने विकसित होत असलेल्या परिसरात एक स्वतंत्र व आधुनिक पोलीस ठाणे उभारणे ही काळाची गरज होती. या नव्या इमारतीमुळे स्थानिक नागरिकांना पोलिसी सेवा अधिक सुलभ होणार असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.