प्रशासनाची झोप उडणार कधी? आग लागल्यावरही नव्हे, तर जिवीतहानीनंतर?
विषय हार्ड न्युज,पुणे – सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द येथील कै. दत्तात्रय नवले अग्निशमन केंद्राच्या विदारक स्थितीमुळे हजारो नागरिकांचा जीव रोज धोक्यात आहे. सद्या या केंद्राकडे केवळ एकच वाहन असून, प्रशिक्षित मनुष्यबळाचीही कमतरता मोठ्या स्वरूपात जाणवत आहे.
धायरी, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगरसारख्या विस्तीर्ण आणि वेगाने वाढणाऱ्या लोकवस्तीचा संपूर्ण भार या एकाच वाहनावर टाकण्यात आलेला आहे. औद्योगिक वसाहती, गाळे, गृहनिर्माण संकुलं, दुकाने यामुळे आगीचे प्रकार वाढत असताना, फक्त एक वाहन आणि अपुरे कर्मचारी हे प्रशासनाच्या ‘चेतना हरपलेल्या’ धोरणाचं प्रतीक ठरत आहे.

अवास्तव स्थिती अशी की, पुणे महापालिकेच्या हद्दीत आग लागली तरी PMRDA च्या गाड्या वेळेवर पोहोचतात; पण PMC चं वाहन अजून निघालेलं नसतं. मग विचार करा, जर उद्या एखाद्या इमारतीत शॉर्टसर्किटने आग लागली तर त्या एका गाडीच्या उशिरामुळे किती जणांची प्राणहानी होईल?
ही केवळ बेफिकिरी नव्हे, तर ही अपरोक्ष हत्याच आहे.
लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी फोटोसेशन्स आणि उद्घाटनं यासाठी अग्निशमन केंद्र उभं केलं, पण त्यानंतर पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं. आजच्या घडीला जर वडगाव, धायरीसारख्या भागात कोणतीही मोठी आग लागली, तर प्रशासन पूर्णपणे हतबल आहे.
प्रश्न असा आहे – किती जीव गेल्यावर महापालिका जागे होणार? आणि मग त्या प्रेतांवर राजकारणाचा फड रंगणार का?
नागरिकांनी यासाठी आता एकत्र येत सोशल मीडियावर, स्थानिक प्रतिनिधींना जाब विचारत मोहीम उभारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाला गाफील राहू देणं याचं पर्यवसान भविष्यातील एखाद्या मोठ्या दुर्घटनेत होणार हे निश्चित.
लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी, अग्निशमन विभाग – सर्वांनी मिळून तातडीने या केंद्रात नव्या गाड्या, अत्याधुनिक उपकरणं, आणि भरपूर कर्मचारी वर्ग नेमण्याची कार्यवाही सुरू करावी, अन्यथा लोकशाहीत जागरूक नागरिकांचा दबाव काय असतो हे दाखवण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी.