विषय हार्ड न्युज,पुणे : सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाईम थिएटर दरम्यानचा २.२ किमी लांबीचा बहुप्रतीक्षित उड्डाणपूल गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलामुळे वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड आणि खडकवासला भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले:
“हा केवळ वाहतूक प्रकल्प नाही, तर पुण्याच्या नवनिर्माणाचा टप्पा आहे. प्रदूषण, वाहतूक वेळ यामध्ये लक्षणीय घट होईल. पुण्याचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले:
“या पुलासाठी सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची दीर्घकालीन मागणी होती. हा पुण्यातील सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असून दररोज १.५ लाख वाहने या मार्गावरून जातात.”
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या:
“हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करणे ही प्रशासनाची सकारात्मक भूमिका दर्शवते. यामुळे धायरी व परिसरातील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे.”

उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये:
• एकूण लांबी : २,१२० मीटर (टप्पा २)
• कामाची किंमत : ₹११८.३७ कोटी (संपूर्ण प्रकल्प)
• काम पद्धत : प्री-स्ट्रेस बॉक्स गर्डर
• टप्पा १ : ५२० मी, टप्पा २ : २.२ किमी, टप्पा ३ : १.५ किमी (१५ जून २०२५ पर्यंत पूर्णत्वास)
मुख्य फायदे:
• दररोज ३० मिनिटांचा वेळ वाचणार
• इनामदार चौक, संतोष हॉल चौक, माणिक बाग यांमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
• सुमारे दीड लाख प्रवाशांना फायदा
• पर्यावरण पूरक प्रकल्प
या उद्घाटनास खासदार मेधा कुलकर्णी, आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, आमदार हेमंत रासने, बाबा मिसाळ ,माजी महापौर दत्ता धनकवडे , श्रीकांत जगताप, मंजुषा नागपुरे,आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनानंतर पवार आणि मान्यवरांनी पुलावरून प्रवास करून पाहणी केली.
