विषय हार्ड न्युज,पुणे: शहरातील कात्रज येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर एक आगळंवेगळं दृश्य पाहायला मिळतंय. जिथे इतर ठिकाणी ओला कचरा डोकेदुखी ठरतो, तिथे मात्र या कार्यालयाने ‘किचन वेस्ट’चा कल्पक वापर करून एक सुंदर व हरित गार्डन साकारले आहे. या टेरेसवर आज फुलझाडे, फळझाडे, वेलभाज्या आणि पालेभाज्यांचा हिरवागार गालिचा फुलला आहे.

स्वच्छता मोहिमेच्या पुढील पायरीवर जात, या गार्डनमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांनीच स्वखर्चाने व वेळ देत ही हरित निर्मिती केली आहे. किचन व भाजीपाला कचर्याचे योग्य विघटन करून सेंद्रिय खत तयार करण्यात येते आणि त्यातूनच या झाडांना जीवन मिळते. पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठरणारी ही कल्पना इतर शासकीय कार्यालयांसाठीही प्रेरणादायी आहे.
शहरातील इतर कार्यालयांनी आणि सोसायट्यांनी या मॉडेलचा अवलंब केल्यास कचराप्रश्नावर नियंत्रण ठेवता येईलच, पण हरित पुण्याचं स्वप्नही साकार होईल.