विषय हार्ड न्युज,नवी मुंबई : नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. केवळ शरीरसुखासाठी केलेल्या मागणीला नकार दिल्याने एका १७ वर्षीय अल्पवयीन नराधमाने १२ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. गुरुवारी रात्री मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृतक मुलगी एकाच भागात राहात होते. पूर्वीपासूनच ओळख असल्याने अल्पवयीन आरोपीने मुलीला डोंगराळ भागात नेले आणि शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र, नकार मिळताच संतापलेल्या नराधमाने तिला अमानुषपणे ठेचले आणि मृत्यूमुखी पाठवले. हत्या केल्यानंतर आरोपीने मुलीचा मोबाईल हिसकावून घटनास्थळावरून फरार झाला.
मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी सुरुवातीला तडजोडीची भूमिका घेतल्याचा आरोप आता स्थानिकांकडून केला जात आहे. अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, मोबाईल परत देण्यासाठी परत आलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले.
या अमानुष घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका अल्पवयीन मुलाने इतक्या क्रूरतेने हत्या करणे, आणि पोलिसांचा सुरुवातीला हलगर्जीपणा पाहता नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘पोलीस यंत्रणेकडून महिलांच्या सुरक्षेची केवळ चर्चा आणि भाषणेच शिल्लक राहिली आहेत काय?’ असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
सध्या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकारामुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.