विषय हार्ड न्युज,पुणे, दि. २६:
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन तरुण पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन मृत पर्यटकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
“आपल्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरीही आपण धैर्य न सोडता खंबीरपणे उभे राहावे. राज्य शासन आपल्या सोबत असून, या संकटात आपण एकटे नाहीत,” अशा समजुतीच्या शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

गणबोटे कुटुंबियांच्या गंगानगर, कोंढवा येथील निवासस्थानी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सुनील कांबळे तसेच कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा तुषार आणि कुणाल, स्नुषा कोमल गणबोटे आदी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे, संतोष जगदाळे यांच्या कर्वेनगर येथील घरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट देऊन जगदाळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे उपस्थित होते. स्वर्गीय संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे आणि मुलगी असावरी जगदाळे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केल्या.
घटनेच्या तपशीलांबरोबरच आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी राज्य सरकारने सदैव मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले.